मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अर्जासाठी शासनाने 31 ऑगस्ट पर्यत मुदतवाढ दिलेली असून या दरम्यान महिलांनी एजंट अथवा दलालांच्या भुलथांपांना बळी न पडता त्यांच्यापासून दुर रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बुधवार दि. 3 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता केलंय.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी ही योजना सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला 1 हजार 500 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. सदरील अर्ज हे अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, महापालिकेचे वार्ड ऑफीस, सेतू सुविधा केंद्र येथून ऑनलाईन पध्दतीने दाखल करता येईल. या योजनेच्या नावनोंदणी होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनाने अर्ज दाखल करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवली. त्यामुळे महिलांनी अर्ज दाखल करण्याकरीता गर्दी करु नये. योजनेचा अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रीया विनामूल्य आहे. त्यामुळे जालना जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.