वाटूरफाटा येथून एका महिलेला पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्या एका इसमाला पोलीसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस मागे लागल्याचं पाहताच त्याने त्याचं वाहन सुसाट पळविलं. वाटूर फाटा, विरेगाव आणि रामनगर टोल नाका येथे वाहनांना धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे आणि पोलीस उप निरीक्षक राकेश नेटके यांनी जिवाची बाजी लावून सदरील वाहन चालकाला पकडलं. ही घटना बुधवार दि. 3 जुलै 2024 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली.
छत्रपती संभाजीनगर येथील एक इसम वाटूर फाटा येथील एका महिलेस ब्लॅकमेल करीत होता. सदरील महिलेला घेवून जातांना पोलीसांनी त्याचा पाठलाग केला. परंतु, पोलींसाना पाहुन त्याने वाहन क्रमांक एमएच 20 जी वाय 1482 या वाहनासह धुम ठोकली. वाहन पळवित असतांना त्याने वाटूरफाटा येथे एका वाहनाच धडक दिली, त्यानंतर त्याला आडविण्यासाठी विरेगाव येथे दुचाकी आडव्या लावण्यात आल्या, परंतु, त्यांनाही धडक देत वाहन पळविले. त्यानंतर मौजपुरी पोलीसांनी प्रिप्री डुकरी येथील टोल नाक्यावर त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीसांच्या वाहनालाही धडक देऊन वाहन चालक जालन्याच्या दिशेने वाहन पळवू लागला. त्यामुळे मौजपुरी पोलीसांनी पाठलाग करुन रामनगर पोलीस चौकीच्या समोर पोलीसांचे जिवाची बाजी लावून वाहनासह पळून जाणार्या इसमाला ताब्यात घेतलं. मौजपुरी पोलीसांनी वाटरफाटा येथून आलेल्या पोलीसांच्या ताब्यात वाहनासह इसमाला दिलंय. या प्रकरणी महिलेला ब्लॅकमेल करणार्या आणि वाहनांना धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणार्यावर उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिलीय.