अहमदनगर : कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. तर तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून 28 वर्षीय सोहेल हारून पटेल या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. काल रात्रीच्या सुमारास सोहेल याचे अपहरण करत आरोपींकडून जबरी मारहाण केल्याचा आरोप सोहेल पटेलच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ही घटना घडताच मयताच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून तीन जण अद्याप फरार आहेत. फरार संशयितांना पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.