जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठ्ठी कारवाई केली असून दोन आरोपीसह तब्बल 16 दुचाकी जप्त केल्यात. ही कारवाई शुक्रवार दि. 26 जुलै 2024 रोजी करण्यात आली असल्याची माहिती दुपारी 1 वाजता पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी दिलीय.
जालना जिल्हयामध्ये दुचाकी चोरांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपानी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दुचाकी चोरांसाठी विशेष पथकं तयार करुन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
दिनांक 26 जुलै 2024 रोजी जालना शहरामध्ये नामे सय्यद अल्ताफ सय्यद अहमद, वय-21 वर्ष, रा. नॅशनलनगर, जालना हा त्याच्या साथीदारांसोबत मोटार सायकल चोरी करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर रोड, जालना येथे दुचाकी चोरांचा शोध सुरु केला. त्यावेळी सय्यद अल्ताफ सय्यद अहमद याला ताब्यात घेत त्याची चौकशी करण्यात आली. त्याने दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यासाठी त्याचा मित्र नामे महंमद फिरोज ऊर्फ बब्बी कलीमोद्दीन, वय- 19 वर्ष, रा. कुचरवटा, जालना व एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशांनी मिळुन जालना शहरातील मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार महंमद फिरोज ऊर्फ बब्बी कलीमोद्दीन, वय 19 वर्ष, रा. कुचरवटा, जालना व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीसांनी चौकशी केली. त्यावेळी विधी संघर्षग्रस्त बालकाने जालना शहरातील विविध ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी करुन आरोपी नामे सय्यद अल्ताफ सय्यद अहमद व महंमद फिरोज ऊर्फ बब्बी कलीमोद्दीन यांना विक्रीसाठी आणून दिल्या. चोरीच्या मोटार सायकली फायनान्स कंपनीने ओढुन आणलेल्या असल्याचे भासवुन जालना शहरातील नागरीकांना मोटार सायकल विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे ज्यांना मोटार सायकल विक्री केल्या त्या इसमांकडुन 16 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपीतांनी 16 मोटार सायकली या सदर बाजार पोलीस ठाणे, चंदनझिरा पोलीस ठाणे, कदीम जालना पोलीस ठाणे, तालुका जालना पोलीस ठाणे व हसनाबाद पोलीस ठाणे हददीतुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोनि. सय्यद मजहर, सपोनि, योगेश उबाळे, सपोनि. शांतीलाल चव्हाण, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, प्रशांत लोखंडे, सतिष श्रीवास, अक्रूर धांडगे, धीरज भोसले यांनी केली आहे.