जालना शहरातील संभाजीनगर भागात भाड्याने राहणार्या सासुचा तिच्याच सुनेने धारधार हत्याराने खून करुन फरार झाल्याची घटना बुधवार दि. 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.
जालना शहरामधील भोकरदन नाका परिसरातील संभाजीनगर प्रियदर्शनी कॉलनी येथे हा प्रकार घडला आहे.
बीड येथील शिनगारे कुटुंब काही दिवसापासून या ठिकाणी भाड्याने राहता होते. सहा महिन्यापूर्वी आकाश संजय शिनगारे (रा. वावरे अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड, प्रिदर्शनी कॉलनी, भोकरदन नाका, जालना) यांचा परभणी येथील प्रतीक्षा सोबत विवाह झाला होता. आकाश हा खासगी नोकरीनिमित्त सध्या लातूर येथे राहतो.
प्रतीक्षा ही सासू सविता सोबत जालन्यात राहत होती. आज पहाटे सासू सविता हिचा भीतीवर डोके आपटून तसेच तीक्ष्ण हत्याराने सुनेने खून केला. त्यानंतर मयत सविताचा मृतदेह गोणीत भरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तिला मृतदेह घेऊन जाता आला नाही. दरम्यान, संशयित प्रतीक्षा शिनगारे ही पहाटे ५:२८ वाजता घरातून बाहेर पडताना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रतीक्षा शिनगारे ही साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून फरार झाली असून तिला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथक रवाना झाली आहेत.




















