जालना – महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या खूनाच्या घटनेतील आरोपी सुनेला जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासातच अटक केली. सासू सविता शिंगारे यांचा खून करुन सुन प्रतिक्षा शिंगारे ही माहेरी निघून गेली. परंतु, माहेरात जावून पाणी पिते ना पिते तोच जालना स्थानिक गुन्हे शाखेने सुनेला ताब्यात घेतलं असल्याची माहिती बुधवार दि. 2 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 वाजता स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली.
भोकरदन नाका, संभाजीनगर भागातील प्रियदर्शनी कॉलनीत ऋषीकेश मालुसरे यांच्या घरात सुन प्रतिक्षा शिंगारे आणि सासु सविता शिंगारे या दोघी राहत होत्या. प्रतिक्षाचा विवाह मागील 6 ते 7 महिन्यापुर्वीच बीड जिल्ह्यातील तरुणासोबत झाला होता. सुरुवातील प्रतिक्षाच्या नवर्याची नोकरी जालना येथे असल्याने ते जालना येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. परंतु, प्रतिक्षाच्या नवर्याची बदली लातूर येथे झाली. त्यामुळे तो लातूर येथे राहण्यासाठी गेला. परंतु, दोघ्या सासु-सुना या जालना येथेच राहत होत्या. दि. 1 एप्रिल 2025 रोजी रात्री 2 वाजता प्रतिक्षाच्या नवर्याचा फोन आला. प्रतिक्षा ही नवर्याशी बोलत असतांना सासू सविता शिंगारे हीने मुलाशी बोलू दे म्हणून सुनेला सांगीतले. परंतु, सुनेने सासुला बोलूच दिले नाही आणि फोन कट केला. त्यामुळे सासूचे आणि सुनेचे कडाक्याचे भांडण झाले. सदरील भांडण हे रात्री 2 वाजेपर्यंत सुरुच होते.
भांडण सुरु असतांना सासुने सुनेला दोन चापटा मारल्या. त्याचाच राग अनावर झाल्याने आणि जन्मापासून आतापर्यंत प्रतिक्षाला कुणीच मारलेलं नसल्याने तीने रागाच्या भरात जवळ पडलेला चाकू उचलून सासूला मारला. सुमारे 6 ते 7 चाकूचे वार करुन सासूला जिवे ठार मारले. सासु मेल्यानंतरही सुन सासुजवळच बसून होती. नंतर तीने एक गोणी घेतली आणि सासुचा मृतदेह गोणीत भरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सासू गोणीत बसत नसल्याने सुनेने सासूचे पाय आगोदर गोणीत टाकले आणि नंतर सासूचा मृतदेह गोणीत बांधून ठेवला. मृतदेहाची गोणी उचलून जिन्या खाली ठेवणार होती. परंतु, गोणी उचलत नसल्याने सुनेने गोणी फरफटत आणली. आणि बाहेरच ठेवली. गोणी बाहेर ठेवून सुनेने पोबारा केला. मात्र फोन घरातच विसरुन राहील्याने ती पुन्हा फोन घेण्यासाठी घरी परत आली.फोन घेऊन प्रतिक्षा बस स्टॅडच्या दिशेने निघून गेली. रस्त्यातच तिने रिक्षा चालकास 20 रुपये देऊन थेट रेल्वे स्टेशन गाठले. खून केल्यानंतरही प्रतिक्षा सकाळी 10.30 वाजेपर्यंत जालना रेल्वे स्थानकातच होती. त्यानंतर तीने सचखंड एक्सप्रेसमध्ये बसून विनाटीकीट प्रवास करुन परभणी गाठले. परभणीच्या रेल्वे स्थानकावर ती जवळपास एक ते दिड तास बसली. परंतु, तीच्या आई-वडीलाकडे गेली नाही. नंतर तिने तीच्या चुलत भावाला फोन करुन मला फक्त फ्रेश होण्यासाठी यायचे आहे, असे सांगून तीने चुलत भावाला बोलावून घेतलं. तीच्या चुलत भावासोबत ती चुलत भावाच्या घरी गेली. घरात बसून ती पाणी पित असतांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीला ताब्यात घेतलं. नंतर तीच्या आई-वडील आणि सख्या भावाला माहिती देण्यात आली. भावाला माहिती होताच भाऊ देखील तिच्यावर चिडला. परंतु, घटना घडून गेल्याने ते देखील हतबल झाले होते. अवघ्या 20 वर्षाच्या सुनेने सासूला संपवले खरे परंतु, तीने तिच्या स्वतःच्या आयुष्यालाही संपवले आहे. हे देखील तितखेच खरे आहे.