जालना जिल्ह्यातील सोलापूर – धुळे महामार्गावरील सौंदलगाव शिवारातील हॉटेल शिव सम्राट जवळील वळण रस्त्यावर गाडीवरचा ताबा सुटल्याने भिषण अपघात झाल्याची घटना सोमवार दि. 19 मे 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता झाल्याचे माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उप निरीक्षक रामदास निकम यांनी दिलीय.
सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरुन कार क्रमांक एमएच 20 सीएस 44 22 चा चालक अमरदीप बाबुराव चव्हाण हे छत्रपती संभाजीनगर कडून बीड कडे जात होते. त्यांची गाडी ही सौंदलगाव शिवारातील हॉटेल शिव सम्राट च्या जवळील वळण रस्त्यावर आली असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रीत झाली. त्यामुळे भिषण अपघात झाला असून गाडी लिंबाच्या झाडाला जावून धडकली आणि पलटी झाली. या अपघातात एक महिला व एक लहान मुलगी मयत झाली. तर एक महिला गंभीर जखमी आहे. तसेच इतर चार जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रोहिणी अमरदीप चव्हाण वय 32 वर्ष, राहणार टिळक नगर, एन-4 सिडको, छत्रपती संभाजीनगर, नूरवी अमरदीप चव्हाण वय अडीच वर्षे असे मयताची नावे आहेत.
या अपघातात कमलबाई बाबुराव चव्हाण, वय 65 वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर या गंभीर जखमी असून अमरदिप बाबुराव चव्हाण, प्रदीप बाबुराव चव्हाण, रुद्राक्ष प्रदीप चव्हाण, विश्रांती प्रदीप चव्हाण हे किरकोळ जखमी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक आर. के. निकम, पोलीस कर्मचारी बर्ले, बिरकायलु, जगधने, बेडेकर यांनी अपघातस्थळी भेट देत अपघाताची पाहणी करुन तात्काळ मदत केली.