अंबड व घनसावंगी तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शासनाने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्यांसाठी जाहीर केलेल्या अनुदानाच्या याद्यांमध्ये बनावट नावे अपलोड करून लाखो रुपयांची रक्कम परस्पर घेण्यात आल्याप्रकरणी फरार असलेला तलाठी प्रवीण भाऊसाहेब सिनगारे (वय 36, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) यास अखेर अटक करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शासनाने विविध जीआरद्वारे अनुदान जाहीर केले होते. मात्र याद्या अपलोड करण्याचे कामकाज करणार्या काही अधिकारी-कर्मचार्यांनी अनेक बोगस नावे समाविष्ट करून त्यांच्याअनामत रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकार्यांकडे प्राप्त झाल्या. यानंतर झालेल्या चौकशीत 240 गावांमध्ये एकूण 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल समितीने सादर केला.
या चौकशीनंतर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 453/2025 नोंदवण्यात आला असून विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे. तपासाची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली असून यापूर्वी 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
प्रवीण सिनगारे हा या गुन्ह्यातील महत्त्वाचा फरार आरोपी असून मागील चार महिन्यांपासून तो सतत मोबाईल क्रमांक व ठिकाणे बदलत पोलिसांना चकवा देत होता. अटकेपूर्वी जामीन मिळविण्यासाठी विविध प्रयत्न करीत असताना अखेर धाराशिव शहरात तो पोलिसांना मिळून आला आणि त्याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 11 वर पोहोचली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाहीमध्ये पोलीस निरीक्षक मिथुन घुगे आणि त्यांच्या पथकातील गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर तसेच महिला अंमलदार जया निकम, निमा घनघाव आणि मंदा नाटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




















