जालना जिल्हा पोलिस दलाच्या गुन्हे अन्वेषण आणि कायदा-सुव्यवस्था याबाबतच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना येथे सर्वसमावेशक गुन्हे आढावा परिषद घेतली. शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी तसेच शाखा प्रमुख यांची या बैठकीस उपस्थिती होती.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या एक कोटी सत्तावन लाख रुपये अनुदानातून जालना जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेसाठी आधुनिक साधनसामग्रीचे वितरण करण्यात आले. यामध्ये 30 झेरॉक्स मशीन, 60 संगणक संच, 60 प्रिंटर आणि 10 लॅपटॉपचा समावेश असून ही उपकरणे जिल्ह्यातील पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये तसेच विविध शाखांना देण्यात आली.
त्यानंतर नोव्हेंबर 2025 महिन्यात उल्लेखनीय कामगिरी करणार्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पुढील सत्रात जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल आणि चारचाकी वाहनचोरी यांसह इतर प्रलंबित गुन्ह्यांची स्थिती तपासण्यात आली आणि हे गुन्हे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मिश्र यांनी अमली पदार्थविरोधी कारवायांना गती देण्याचे निर्देश सर्व प्रभारी अधिकार्यांना दिले. उपविभागीय अधिकारी व ठाणे प्रमुखांनी गावभेटी वाढवून नागरिकांशी संवाद साधावा, प्रत्येक गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जनजागृती करावी, तसेच नवीन कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना देण्यात आल्या.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांवर दर्जेदार मोहीम राबवावी, असे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी स्पष्ट केले.
या बैठकीस पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाणे प्रमुख व शाखा प्रमुख उपस्थित होते. या गुन्हे आढावा परिषदेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रण, गुन्हे तपास आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




















