- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज रविवारी(दि.18) रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भावाच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खा. अमोल कोल्हे यांच्यात 45 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती पुढे आली.
कोल्हे यांनी जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावल्याने राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
जालन्यात भास्कर दानवे यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे उद्घाटन रविवारी पार पडले. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खा. अमोल कोल्हे यांचे पगडी देऊन स्वागत केले. हा कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हे आणि रावसाहेब दानवे यांच्यात 40 ते 45 मिनिटे दानवे यांच्या गाडीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र कोल्हे यांच्या या अचानक हजेरीमुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आले आहे.