दारू पिण्यास पैसे न दिल्याने बांधकाम मजुराच्या डोक्यात गज मारुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील एका बांधकाम प्रकल्पावर घडली. या प्रकरणी एका मजुराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुचू मनधुवा मुरमू (वय ४९, सध्या रा.कुमार प्राॅपर्टी लेबर कॅम्प, अमानोरा माॅलजवळ, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी बांधकाम मजूर संजय कुनू चौरसिया (वय १९) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौरसियाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सद्दाम हुसेन (वय ३१, रा. केशवनगर, मुंढवा) याने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमानोरा पार्कजवळील नियोजित बांधकाम प्रकल्पावर मुरमू आणि आरोपी चौरसिया मजुरी करतात. मुरमू याच्याकडे चौरसियाने दारू पिण्यास पैसे मागितले.
मुरमूने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्या डोक्यात गज मारला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुरमुचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक कवीराज पाटील तपास करत आहेत.