शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं. आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचं वातावरण असून ठाकरे गटातून संताप व्यक्त केला जात आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा एकतर्फी असून आयोग बरखास्त करा अशी मागणी, उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या या मागणीला भाजपच्या माजी मंत्र्याने समर्थन दिलं आहे.
भाजपचे माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा देत भाजपला घरचा आहेर दिला आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना हटवण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला मी पाठिंबा देत आहे. कारण त्यांचा याआधीचा वित्त मंत्रालयातील कार्यकाळ संशयास्पद होता, असं ट्विट भाजपचे माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. त्यांच्या या मागणीला ठाकरे गटाचे खासदार यांनी समर्थन दिलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेत गंभीर आरोप केले होते. “पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो निर्णय अयोग्य आहे. आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे, असा निवडणूक आयोग बरखास्त करावा. कोर्टात यांची मनमानी चालणार असं होणारं नाही. सध्या गुंतागुंत वाढावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित करत सध्याचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
“आता 16 जण गेले त्यानंतर 23 अपात्र केल्याची नोटीस दिली आहे. दोन तृतीयांश एका पक्षात विलीन व्हायला हवेत मात्र तसं झालेलं नाही. मधल्या काळात एक वादग्रस्त आयुक्त नेमले गेले आणि घाईघाईत त्यांची नियुक्ती कशी काय झाली याचं उत्तर द्यायला हवं. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. गुंता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय दिला का? अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली होती.
त्याचबरोबर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत असाच वाद झाला होता. बाकी कुणालाही अशा प्रकारे देण्यात आलेलं नाही. मधल्या काळात बातम्या आल्या की बोगस शपथपत्र आम्ही दिली आहेत. मात्र याची चौकशी झाली आणि असं काहीचं नसल्याचं समोर आले. आम्ही लाखोंनी कागदपत्रं दिली, मात्र त्याचं पुढं काय झालं? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता.