आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु होत असून, त्यापूर्वीच औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीची परीक्षा काही तासांवर आलेली असताना एन-8 सिडको भागातील गुरूनगर हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी ही उघडकीस आली. दरम्यान या विद्यार्थ्याने परीक्षेच्या तणावातूनच आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांसह नातेवाइकांनी वर्तविला आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमन रवींद्र आहेरेवाल (वय 18, रा. एन 8, गुरूनगर हौसिंग सोसायटी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन आहेरेवाल हा कुलभूषण गायकवाड महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीला असून, एक भाऊ पुण्यात नोकरी करतो. दरम्यान बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने तो या परीक्षेची तयारी करत होता. मात्र परीक्षेला अवघ्या काही तासांचा वेळ शिल्लक राहिला असताना अमनने टोकाचे पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. रविवारी सायंकाळी जेवण केल्यानंतर अमन आपल्या तिसऱ्या मजल्यावरील अभ्यासाच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. मात्र तो सोमवारी सकाळी खाली आलाच नाही. दुपारी जेवणासाठी आजोबा अमनला बोलावण्यासाठी गेले असता, अमना फासावर लटकलेला दिसला. त्यास नातेवाइकांनी बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
दरम्यान अमनने परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याचा त्याने आधीच निर्णय घेतला होता आणि रविवारी रात्री आत्महत्या करण्याची तयारी केली. अमनने पहिल्या मजल्यावरून अॅल्युमिनिअमची शिडी तिसऱ्या मजल्यावरील त्याच्या अभ्यासाच्या खोलीत घेऊन गेला होता. त्याच शिडीच्या सहाय्याने त्याने छताच्या हुकाला ओढणी बांधून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.