छत्रपती संभाजीनगर : धुनी- भांडी, फरशी पुसणे, झाडलोट ही कामे करायला लावायचा. इतकेच नाही तर १३ वर्षीय पोटच्या मुलीला जन्मदात्या बापानेच माचीसच्या काडीने चटके देऊन गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना शहरातील संजयनगर, बायजीपुरा येथे उघडकीस आलीय.
मोहसीन अल अमोदी सईद अमर अमोदी असे आरोपी बापाचे नाव आहे. मोहसीन याने मुलीला मारहाण करून माचीसच्या काडीने हातापायावर, गालावर चटके देऊन गंभीर जखमी केले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीची आई दुसरे लग्न करून निघून गेली. यामुळे मुलगी वडिलांसोबत राहते. सुरुवातीला ती आत्याच्या घरी राहिली; यानंतर वडिलांकडे आली.
बाजूलाच तिचे आजी राहते आणि वडील पायाने अपंग आहेत. आजीकडे जेवण करून ती वडिलांचाही डबा घेऊन येत होती. तसेच घरातील लहान सहान कामे करत होती. त्यातच किरकोळ कारणावरून वडिलांनी मुलीला मारहाण करून चटके दिले. यामुळे मुलगी आरडाओरडा करू लागली. याबाबत शेजारच्यांना कळताच त्यांनी पोलिसांना बोलावले आणि पीडित मुलीच्या जबावावरून वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी पसार आहे.