बीड – पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेली १२ वर्षीय शाळकरी मुलगी पाय घसरल्याने पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी १७ वर्षीय तरुणाने तलावात उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. अश्विनी लहु जाधव (वय १२ वर्ष) आणि रोहित परमेश्वर चव्हाण (वय १७ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दसरा सण जवळ आल्याने घरातील कपडे धुण्यासाठी अंबासाखर कारखाना (Beed News) परिसरातील दोन कुटुंब पाझर तलावावर गेले होते.
यावेळी कपडे धुत असताना अश्विनीचा पाय घसरला आणि ती थेट तलावाच्या पाण्यात पडली. आश्विनीला बुडताना पाहून रोहितने तलावात उडी घेतली. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.