सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी टू च्या वतीने मंगळवार दि. 20 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले. या निदर्शनात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर, शालेय पोषण आहार कामगार बांधकाम कामगार नगरपरिषद कंत्राटी कामगार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
निदर्शनाच्या वेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत श्रम संहिता रद्द करा, जन सुरक्षा विधेयक मागे घ्या, कामगारांना किमान वेतन त्वरित द्या,लाल बावटा जिंदाबाद अशा घोषणा दिल्या व यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले की,कामगार विरोधी चार श्रम संहिता व महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आणि संघटित, असंघटित कामगारांच्या कायम काम, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा व अन्य मूलभूत सुविधा पासून कामगार वंचित आहेत. त्यामुळे कार्पोरेट धार्जिन्या, कामगार विरोधी चार श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूचे कायदे करा व त्यांची कडक अंमलबजावणी करा. अंगणवाडी कर्मचारी, आशा व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कामगार यांचे थकित मानधन त्वरित अदा करा. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक त्वरित मागे घ्या. समान व एकसारख्या कामासाठी कंत्राटी कामगारांना नियमित कामगारासारखे वेतन व इतर लाभ द्या. राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या. आशा, अंगणवाडी कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी, शालेय पोषण आहार कामगार आदी सर्व योजना कर्मचार्यांचे 45 व 46 व्या भारतीय श्रम परिषदेच्या शिफारसीनुसार नियमीतीकरण करा व त्यांना 26 हजार रुपये द्या. बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळात नोंद करण्यासाठी ग्रामसेवकांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आदेशित करा. आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी कामगार नेते अण्णा सावंत, सिटू चे जिल्हाध्यक्ष मधुकर मोकळे, मारुती खंदारे सरिता शर्मा, ड.अनिल मिसाळ,मीरा बोराडे, हरिचंद्र लोखंडे, संतोष पाटोळे, कांचन वाहुळे, बाबासाहेब पाटोळे, संजय खंडागळे, शेषराव कान्हेरे,यादवराव दिघे, चंपाबाई दाभाडे, सुनिता म्हस्के आशा रगडे,गोविंद चांदगुडे,मंगल साबळे, लक्ष्मण मोहिते,गणेश पवार संगीता तांबे,सुनिता पिंपळे,राम खवाटे यांच्या सह कामगारांची उपस्थिती होती.