जालना शहरातील मंगळ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरु असून ते बंद करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. रिमा खरात काळे यांनी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अॅड. रिमा काळे खरात यांनी मंगळवार दि. 20 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता चक्क मंगळबाजार येथे जावून लाईव जुगाराची माहिती दिली.
मंगळ बाजार परिसरात जुगार अड्डे सुरु आहेत. त्यासंबंधीत माहिती सोशल मिडीया आणि निवेदनामार्फत पोलीस प्रशासनाकडे देण्यात आली होती. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सोशल मिडीयावर मटका जुगाराचे काही आकडे असलेल्या पावत्या शेअर करण्यात आल्या. तर मटका सुरु असल्याचा एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला. त्यावरही काहीच कारवाई होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अॅड. रिमा खरात-काळे यांनी थेट मंगळबाजार येथे जावून काही पत्रकारांना जुगाराची माहिती दिली. तसेच पोलीस प्रशासनावर देखील ताशेरे ओढलेत. सध्या मंगळबाजार परिसरात सुरु असलेले जुगाराचे अड्डे तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली.