बुलढाणा – मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली एसटी बस धाड रोडवरील मर्दडी घाटातील वळणावर उलटली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात काही प्रवाशांना जबर मार लागला. त्यांना तातडीने उपचारासाठी धाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अपघाताची ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी मलकापूर आगाराची बस पहाटेच्या सुमारास आगारातून निघाली.
या बसमधून १३ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, बस धाड रोडवरील मर्दडी घाटात आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत उलटली. सुदैवाने दरीत झाडांची संख्या अधिक असल्याने बस खोल दरीत कोसळली नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर काही जखमींना धाड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.