कुंभारी:-(निर्मला जवळे ) जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव, आणि उत्पादित शेतमालाचे पडलेले भाव. सर्वसामान्याच्या काळजावर घाव घालणारे ठरू पाहत आहेत. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. या महागाईने होरपळलेल्या सामान्यांचे जगणे कठीण झाले असून एकेकाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साडेसहा हजाराचा पल्ला गाठणारा कांदा आज दीड हजार भावात विकल्या जातो आहे. तसेच सोयाबीनचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. भाववाढीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्याने सोयाबीन घरात, वेअ रहाऊस मध्ये तसेच साठवून ठेवले आहे. कधीकाळी सहज आणि अल्प दरात मिळणारी गावरान ज्वारीचे सध्याचे दर 32 ते 35 रुपये झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आता ज्वारीच्या भाकरीचे सेवन महाग पडत आहे. या वाढत्या महागाईने गृहिनीचे बजेट कोलमडले असून आमदनीं अठांनी आणि खर्च रुपया अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेती उत्पादित मालाच्या किमतीत सतत घसरण होतांना दिसून येत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनआक्रोश वाढला आहे. ही, महागाई होऊ घातलेल्या आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला विपरीत परिणामकारक दिसन्याची शक्यता नाकारता येणार नाही. विरोधी पक्षांना मात्र हा मुद्दा कॅच करता येईना. ही त्यांच्यासाठी दुर्दैवाची बाब म्हटल्यास वावगे ठरू नये.
सध्या लोकसभा निवडणुकीचे हलके वारे वाहू लागले असून अनेक नवनवीन चेहरे गुडघ्याला बाशिंग बांधून मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. गावासह शहरात जनमताची चाचपणी घेताना इच्छुक उमेदवार मात्र वाढती महागाई आणि शेती उत्पादित मालाच्या घसरलेल्या भावांबद्दल बोलतांना दिसून येत नाहीत. आम्ही इतरांपेक्षा कसे सरस आहोत , त्यांनी हे ‘ केलं नाही आम्ही ते ‘ करून दाखवू आम्हाला पक्षाने संधी दिल्यास आम्ही मतदारसंघाचां कायापालट करून दाखवू असे भाकड आश्वासने मिळत आहेत. परंतु वस्तुस्थितीवर बोलून जनमत जिंकण्याचा यांच्याकडून प्रयत्न होतांना दिसत नाही.त्यामुळे सत्ताधारी पक्षांवर मात्र जनमत नाराज असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.