कुंभारी :- पणजोबा, आजोबा जवळ शंभर एकर जमीन त्या काळात असायची, चार चार बैल जोड्या असायच्या त्या काळात शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांचे उदरनिर्वाह शेतीवरच होत होते. परंतु आत्ता नवे तंत्रज्ञान येऊनही शेतीचा व्यवसाय तोट्यात येत असल्याने सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांचा शेती विकण्याकडे कल वाढलेला आहे. काही वर्षातच शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सजग राहण्याची गरज आहे.
दक्षिण तालुक्यात विविध कारखाने, अनेक कंपन्यांनी जागा विकत घेतली आहे. त्यातच वळसंग,आचेगाव परिसरात आलेली टाटा सौर ऊर्जा प्रकल्प , मंद्रूप येथे होऊ घालणारी एमआयडीसी, शिवाय शेती व्यवसाय तोट्यात येत असल्याने शेतकरी जमीन विकून इतर व्यवसायात गुंतलेले आहेत. निसर्गाच्या आवकृपेमुळे सातत्याने नापीक होत असल्याने हवालदिल झालेले शेतकरी शेती विकण्याकडे वळले आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्य शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधुनिक युगात तंत्रज्ञान आले असले तरी ट्रॅक्टर, मळणी यंत्र, रोवनी यंत्र, हार्वेस्टर घेण्यासाठी बँकेतून कर्ज काढावे लागते. तसेच बँकेच्या कर्जाची हप्ते द्यावे लागतात. वेळप्रसंगी शेत जमीन गहाण करावी लागते. तरीपण निसर्गाच्या आवकृपेने पिकाचे उत्पादन होत नाही. मागील काही वर्षापासून सतत निसर्गाची अवकृपा होत असल्याने शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळले नाही. नवनवे कायदे शेती व्यवसायाच्या आड येत आहेत. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढावलेली आहे. शेतकऱ्यांना शेतात उत्पादन घेण्यासाठी अवाढव्य खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्षभर शेतात राबुन करायचे काय? त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती विकण्याचा सपाटा सुरू केला आहे. खरीप असो वा रब्बी असो, हिवाळा असो की पावसाळा असो, उन्हाळा असो की थंडीचा महिना असो, अशावेळीही शेतकऱ्यांना शेतीत राबल्याशिवाय गत्यंतर नाही. कधी महापुर, तर कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे पिकांची नासाडी होते. पिकावर रोगराई आल्याने कीटकनाशक, औषधांची फवारणी करावी लागते. बँकाच्या कर्जाचे डोंगर शेतकऱ्यांच्या डोक्यावर चढत राहते. पिकाचे उत्पादन बँकेच्या कर्जाच्या व्याजात जाते म्हणूनच खेड्यापाड्यातील सुशिक्षित बेरोजगार असलेली शेतकऱ्यांची मुले शहरात येऊन सात आठ हजार रुपये महिन्याची नोकरी करायला तयार झाले आहे. परंतु काही अल्पशिक्षित असल्याने खाजगी कंपनीतही शेतकऱ्यांच्या मुलाला कामावर घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे शेतकरी आता कंटाळून शेती विकण्याचा सपाटा सुरू केला आहे.