जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये असलेल्या राम मंदिराच्या बाजूला रेल्वे पटरी शेजारी एका 25 ते 30 वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवार दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने, पीएसआय नांगरे आणि वनवे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. महिलेचे दोन्ही पाय तुटलेले असून हात कुत्र्याने कुरतडलेले दिसून येत आहे.
सदरील मृतदेहाचे शवविच्छेदन हे घटनास्थळीच करावं यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाला पत्र देण्यात आलंय. आज दुपारी तीन वाजेपर्यंत सदरील महिलेचे शवविच्छेदन झालेलं नव्हतं, त्यामुळे हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगणं शक्य नाही. सदरील मृतदेहाचे शवछेदन झाल्यानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. हा घातपात आहे की, रेल्वेखाली आत्महत्या आहे हे मात्र पोलीस तपासामध्ये समोर येईल. रेल्वेखाली आत्महत्या असती तर महिलेचा मृतदेह हा रेल्वे पटरीवर किंवा चिटकूनच असता. परंत, हा मृतदेह रेल्वे पटरीपासून काही अंतरावर झुडूपामध्ये असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आलंय.