जालना शहरातील जुना मोंढा भागातील नथुमल वासुदेव कापड दुकानात झालेल्या चोरीचा छडा स्थानिक गुन्हे शाखा व सदरबाजार पोलीसांनी अवघ्या 12 तासात लावला असून एक कोटी सत्तर लाख 35 हजार 750 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.
या चोरीमध्ये सहभागी असलेल्या 4 गुन्हेगारांना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत दिली.
कुणाल माडीवाले, दुर्गेश ढोलके, रोहन नाईक, राजू लालचंद नाईक असे चोरी करणार्या संशयीत आरोपींची नावे आहेत.
जुना मोंढा जालना येथे नथुमल वासुदेव नावाचे होलसेल कापड दुकान आहे. दि. 25 डिसेंबर 2022 रोजीचे 8 ते दि.26 डिसेंबर 2022 रोजीचे 09:30 वा. दरम्यान दुकानात अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले. पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, स्था. गु.शा.चे पोलिस निरिक्षक सुभाष भुजंग, सदर बाजार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शज्ञानेश्वर पायघन, राजेंद्र वाघ यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली होती. या चोरीच्या तपासासाठी एकूण 04 तपास पथक तयार करण्यात आले होते.
पथकाने चोरीचा तपास करण्यासाठी तांत्रिक विश्लेषकाची व गोपनीय बातमीदाराची मदत घेतली. ही चोरी दुकानातील नोकर कुणाल मनोज महाडीवाले रा. बरवार गल्ली काद्राबाद जालना यांने त्याचे साथीदार यांच्या मदतीने केल्याचे समजले. या तपासासाठी एक पथक शिर्डी येथे दाखल झाले. आरोपी हा शिर्डी रेल्वेस्टेशन मधुन काकीनाडा सिकंदराबाद या रेल्वेत बसुन प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन दुसर्या पथकाच्या मदतीने औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सापळा लावुन संशयीत आरोपी कुणाल मनोज महाडीवाले, दुर्गेश रमेश ढोलके रा. बरवार गल्ली काद्राबाद जालना यांना शिताफीने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना विचारपुस केली असता, त्यांनी चोरीचे नियोजन केले होते, बँकेला सलग दोन दिवस सुट्या असल्याने दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी मोठया प्रमाणावर रोख रक्कम दुकानामधील तिजोरी मध्ये ठेवलेली असल्याची माहिती असल्याचे आरोपींनी सांगीतले.
कुणाल माडीवाले हा दुकानातील एका खोलीमध्ये लपुन बसला होता. तर दुर्गेश ढोलके व रोहन नाईक हे दुकानाबाहेर माहिती घेण्यासाठी थांबले होते. कुणाल महाडीवाले याने तिजोरी ठेवलेल्या स्ट्रॉंग रुमचा दरवाजा तोडुन, तिजोरी जवळ ठेवलेली व तिजोरीतील रोख 1 कोटी 70 लाख रुपये रोख एका ट्रॅव्हलींग बॅगमध्ये भरुन शटर आतुन उघडुन बाहेर आला. व राजु लालचंद नाईक याच्या मदतीने जालना शहरातील एक शटरमध्ये पैशाची बॅग लपवुन ठेवली. आरोपीकडून 1 कोटी 69 लाखल 46,750/- रुपये रोख व 89000/- किंमतीचे गुन्हयात वापरलेली स्कुटी वाहन, मोबाईल असा एकुण 1,70,35,750/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. अक्षय शिंदे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुभाष भुजंग, सपोनि श्री. ज्ञानेश्वर पायघन, (स. बा. जालना). पोउपनि श्री. प्रमोद बोंडले, (स्था.गु.शा.) पोउपनि, राजेंद्र वाघ (स. बा. जालना) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, भाऊराव गायके. गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, रुस्तुम जैवाळ, जगदीश बावणे, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे, गोपाल गोशिक, संभाजी तनपुरे, सचिन चौधरी, फुलचंद गव्हाने, प्रशांत लोखंडे, सुधीर वाघमारे, भागवत खरात, किशोर पुंगळे, परमेश्वर धुमाळ, रवि जाधव, सचीन राऊत, योगेश सहाने, धिरज भोसले व पो.स्टे. सदर बाजार जालना येथील पोलीस अंमलदार सुभाष पवार, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, मनोहर भुतेकर, भरत ढाकणे, गजानन डोईफोडे यांनी केलेली आहे.