जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद रस्त्यालगत कुंभारी शिवारात ट्रॅक्टर अंगावर घालून स्वतः पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मयत विवाहितेचा भाऊ सुनिल माधवराव साखळे (रा. लिहाखेडी ता. सिल्लोड) यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घटनेचा तपास करून पोलिसांनी आरोपी पती गजानन रघुनाथ आढाव (40) याचेवर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान याबाबत समजलेली माहीती अशी की, मयत विवाहिता कविता गजानन आव्हाड (29) यांचा वर्षभरापूर्वी आरोपी गजानन रघुनाथ आढाव (रा. पाल पाथ्री ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) याच्यासोबत विवाह झाला होता. विशेष म्हणजे गजाननचा हा तिसरा विवाह असल्याचे नातवाईकानी सांगीतले. गेल्या दिवसांपासुन दोघांमध्ये भांडणे होत असल्याची माहिती असून आरोपी गजानन विरुद्ध 20 दिवसांपूर्वी संभाजीनगरातील हर्सुल पोलीस ठाण्यात भांडणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर काहीदिवस मयत कविता ही माहेरी आली होती. त्यानंतर कविता हिच्या माहेरच्यांनी व तिच्या सासरच्यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडवून त्यांच्यात समन्वय घडवून आणला होता. त्यानंतर कविता हिला तिचा पती आरोपी गजानन हा चार सहा दिवसांपुर्वीच सासरी घेऊन गेल्याची माहिती कविताच्या नातेवाईकांनी दिली.
विशेष म्हणजे कविता ही सिल्लोड येथील तहसिल कार्यालयात कोतवाल या पदावर कार्यरत होती. तर तिचा पती गजानन हा संभाजीनगर येथे विज वितरण कार्यालयात लिपीक या पदावर कार्यरत आहे. दोघेही सरकारी नोकरदार असल्याने या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. कविता हिची सासु कौशल्या रघुनाथ आढाव, नणंद अरुणा नारायण जाधव, नणंद मिरा जनार्धन चव्हाण, नणंद शिला जनार्धन कोंडके, नणंद तेजस फरकाडे, भाचा गंगाधर श्रीरंग कोल्हे यांनी मयत कविता हिस घर विकत घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करीत असून छोट्या छोट्या कारणावरून तिचा छळ करीत असल्याचे कविताचा भाऊ याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
यासह शनिवारी 31 डिसेंबर रोजी रात्री तिचा पती तिच्या खुनाचा बेत आखुन कुणाच्या तरी मदतीने आरोपी गजानन याने तिला अगोदर मारून टाकले व त्यानंतर हा खून नसून हा अपघात वाटावा, या उद्देशाने तिला ट्रॅक्टरच्या चाकाखाली असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. यावरून सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून सदर आरोपीं विरुद्ध कलम 302,498, ए 323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978