सोलापूर : सोलापुरात एका व्यक्तीने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत आपल्या पत्नीचा कान कापल्याची घटना उघडकीस आली आहे. सोलापूरातील नवीन विडी घरकुल परिसरात ही घटना घडली आहे. त्यानंतर पीडित महिलेच्या आईने इतर नातेवाईकांनी महिलेला ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करत तिच्या कानावर उपचार केलेत. यामध्ये महिलेच्या कानाला काही टाके घालण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरीफा अकिल सय्यद असं या पीडित महिलेचे नाव आहे. संशयित पती अकिल शकील सय्यद हा तिथून बेपत्ता झाला आहे. पीडित महिलेने याविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिला आरिफा सय्यद ही विधवा होती. 2015 पासून ती अकिल सय्यदच्या संपर्कात आली. अकिल हा रिक्षा चालक आहे. अकिल हा देखील विवाहित होता. पहिली पत्नी असतानाही त्याने आरिफा सोबत 2019 मध्ये लग्न केले. लग्नापूर्वी आरिफा ही विधवा असताना अकिलने तिला चांगले नांदवण्याचे आश्वासन दिले होते. पण विवाहानंतर चारित्र्यावर संशय घेत घरगुती हिंसाचार सुरू केला. वाद विकोपाला जाऊन अकिल नेहमी मारझोड करत असल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी आरोपी अकील सय्यद याच्या विरोधात भा.द.वी. कलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शकील हा फरार असून वळसंग पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी दिली आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे. महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून घरी सोडण्यात आलं आहे.