रस्त्यावरुन चालताना दारूच्या नशेत धक्का लागल्याने रागाच्या भरात एकाने दुसऱ्याला बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. धक्का लागल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. मग वाद विकोपाला गेल्याने मारहाण केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत अवघ्या तासाभरातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अजय चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. तर निरंजन यादव असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील फॉलोवर लेन परिसरात गुरुवारी मध्यरात्री निरंजन यादव आणि अजय चव्हाण हे दोघे चालत जात होते. यावेळी त्यांना एकमेकांचा धक्का लागला. यावरून त्यांच्यात वाद झाला. यानंतर अजय चव्हाण याने निरंजन याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत वर्मी फटका बसल्यानं निरंजन हा जागीच कोसळला, यानंतर अजय पळून गेला.
मध्यवर्ती पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत निरंजनचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर हत्येचा तपास करत असताना पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अजय चव्हाण याला अवघ्या तासाभरात अटक केली. अजय चव्हाण याच्यावर याआधी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.