नाशिक – आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलिसांना छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. नाशिक रोड परिसरातील दसक शिवारात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ तरुणाचा मृतदेह आढळला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल केला. प्रेम प्रकरणावरून या तरुणाची हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. तोच धागा पकडत नाशिक पोलिसांनी अवघ्या २ तासात पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलंय.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी जेलरोड येथील पंचक येथे राहणारा ३० वर्षाचा तरुण बेपत्ता झाला होता. यासंदर्भात त्याच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. सोमवारी या युवकाचा मृतदेह दसक शिवारात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ आढळून आला. सुरुवातीला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असता सुरुवातीला ओळख पटली नाही.
पोलिसांनी तपास केला असता मृतदेहाची ओळख पटली. बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून हा प्रेम प्रकरणावरून झालेला असावा असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अवघे २ तासात खून झालेल्या युवकाच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला संशयावरून ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी इतर दोन-तीन व्यक्तींना सुद्धा चौकशीसाठी बोलवलं आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सुभाष घेगलमल यांचे सह पथकांनी ही कामगीरी केली.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील सांताक्रूझ परिसरातही अनैतिक संबंधांतून पत्नीनं पतीला विष देत त्याची हत्या केली. त्यासाठी आरोपी महिलेने प्रियकराची मदत घेतल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं होतं. अनैतिक संबंधांमध्ये नवरा हा अडथळा ठरत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी महिलेनं प्रियकरासोबत असा कट आखला होता.