कोपरगाव (अहमदनगर) : काम केल्यानंतर हक्काचे मजुरीचे पैसे मागितल्याने एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. चौघांनी लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने मजुराचा जीव गेला आहे. हा प्रकार कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे घडला आहे.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या हत्येच्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दिपक दादा गांगुर्डे (वय ४०) असे मयत मजुराचे नाव असून या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. मयत दिपकची पत्नी जया गांगुर्डे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पती दिपक गांगुर्डे याने आरोपी उषा पोळ, स्नेहा पोळ, राज उर्फ बबलू पोळ आणि अण्णा उर्फ अनिल गायकवाड (सर्व रा. येसगाव) यांच्याकडे गवंडी कामाच्या मजुरीचे राहिलेले पैसे मागितले.