जालना : – शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या आर्थिक सक्षमतेकरीता जिल्हयात कृषी उत्पादनांवर आधारीत प्रक्रीया उद्योगावर भर द्यावा. याबाबत प्रशासकीय बाबींच्या अुनषंगाने असणाऱ्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा नियामक मंडळाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस आत्माचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे, प्रकल्प उपसंचालक श्रीकांत देशपांडे, खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक व्ही.एस. सोनुने, बदनापूर कृषी संशोधन केंद्राचे डॉ. सचिन धांडगे, डॉ. के.टी. जाधव, निविष्ठा पुरवठादार संघाचे प्रतिनिधी अतुल ब्रिजमोहन लढ्ढा, शेतकरी प्रतिनिधी उध्दवराव खेडेकर, सुनील लोखंडे आदींसह दुग्ध, मत्स्य व्यवसाय, उद्योग, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
जालना जिल्ह्यात शेतीसाठी पूरक वातावरण आहे. पारंपारिक पिकांबरोबरच मोसंबी, रेशीम, सिताफळ मिरची, द्राक्ष लागवडीवर भर दिला जात आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, जिल्ह्यात रस्ते, रेल्वेमार्ग या दळणवळणाच्या साधनांसह मोठी बाजारपेठ यासारख्या पायाभूत सुविधाही उत्तम आहेत. त्यामुळे कृषी उत्पादनांवर आधारीत प्रक्रीया उद्योग जिल्हयात मोठया प्रमाणात उभारल्यास निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. सध्या रेशीम शेती व त्यावरील प्रक्रीया उद्योगात जिल्हा वेगाने प्रगती करीत आहे. शिवाय मोसंबीचा मोठा उत्पादक म्हणूनही जालना जिल्हा ओळखला जात आहे. मोसंबीवर आधारीत प्रक्रीया उद्योग जर मोठया प्रमाणात सुरु झाल्यास भविष्यात या फळपिकावर आधारीत क्लस्टर निर्माण करता येईल. याच पध्दतीने सिताफळ, बांबू , द्राक्ष यावरील आधारीत प्रक्रीया उद्योगांनाही प्रोत्साहन दिले जाईल. आत्माने या संदर्भात अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावा. याबाबत प्रशासकीय बाबींचे निराकरण करुन प्रक्रीया उद्योगांना निश्चितपणे बळ दिले जाईल.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नाविण्यपूर्ण कल्पना राबविण्याबरोबरच शेती क्षेत्रातील घडामोडींचे अद्यावत मार्गदर्शन होण्याकरीता तज्ञांचे चर्चासत्रही आयोजित करावेत. तसेच जिल्हयाचे शेतीविषयक व्हीजन तयार करण्यासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषीतज्ञ यांनी नवनवीन संकल्पना मांडाव्यात, अशी सुचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्या.
प्रारंभी प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे यांनी आत्माबाबत सविस्तर माहिती दिली. सन 2022-23 व 2023-24 या वर्षात राबविण्यात आलेले विविध उपक्रम व त्यावरील खर्चाची माहिती त्यांनी यावेळी दिली.