कुंभारी:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे गेनसिद्ध ऍग्रो प्रोडूसर कंपनीतर्फे परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत महिला शेतकरी बचत गटास बॅरल चे वाटप संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र होनराव, कृषी सहायक सोनाली नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बँक सखी सुलक्षणा बिराजदार, मानव संसाधन व्यक्ती निर्मला जवळे,अनिता मुनाळे, नागुबाई बिराजदार, महानंदा गदगे, लक्ष्मी जमादार, रूपाली अरगंजे उपस्थित होते.
पिकाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, बुरशीनाशके कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा विनाश होत आहे. जमिनी मृतावत होत चालल्या असून कडक होत आहेत. जमिनीची पोत बिघडून जमीन नापीक होत आहे. उत्पादित शेतमालाची प्रत खालावत आहे. मानव व पशुपक्षी यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मशागतीच्या खर्चात वाढ झाली आहे यास पर्याय म्हणून विषमुक्त सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे, शेतीमध्ये रसायनांचा वापर पूर्णपणे थांबवण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या बॅरेलमध्ये जीवामृत तयार करून शेती करावी.
जैविक पद्धतीने उत्पादित शेतमालाचे सेंद्रिय प्रमाणिकरण, प्राथमिक प्रक्रिया, समूह गट स्थापन करून त्या माध्यमातून शेती उत्पादनांना बाजारपेठे सोबतच योग्य भाव मिळू शकेल यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ नफ्यात वाढ होऊ शकेल असे कृषी सहाय्यक सोनाली नाईक नवरे यांनी सांगितले.