- भोकरदन । भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील पार्वतीबाई रंगनाथ शिंदे (वय ८० वर्ष) या वृद्ध महिलेचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केल्याचा प्रकार सोमवारी(दि. १९) समोर आला आहे. दरम्यान व्याजाच्या धंद्यातून हा खून झाल्याची चर्चा संपूर्ण गावातून होत आहे.
या बाबत सपोनि पोलिस रत्नदीप जोगदंड यांनी सांगितले की, १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता लिंगेवाडी येथील घरात वृद्ध महिलेचे निधन झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून कर्मचारी पाठवून मृतदेह भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. त्यानंतर पंचनामा करून पार्वतीबाई शिंदे यांच्या प्रेताची उत्तर तपासणी करण्यासाठी डाक्टरांनी मृतदेहाची पाहणी केली असता गळ्यावर आवळण्याच्या खुणा दिसल्या. त्यानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये महिलेचा गळा आवळून खून झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पार्वतीबाई यांना एक मुलगी असून ती औरंगाबाद येथे राहाते. तर सावत्र मुलगा गवाताच वेगळा राहतो. त्या एकट्याच घरी राहत होत्या. त्यांचा खून कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलिस करीत आहेत. मात्र, पार्वतीबाई यांचा खून हा व्याजाच्या पैशातून झाला असल्याची गावात चर्चा सुरू आहे.