वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जालना-राजूर रोडवर अवैधरित्या वृक्षतोडीच्या लाकडाची ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून एक ट्रॅक्टर पकडला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने मालकास फोन केला. यावेळी मालक व चालक यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बुक्की करत ट्रॅक्टर घेऊन फरार झाले. दरम्यान, याप्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर मालक ,चालक व अन्य एकाविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीद्वारे खबर मिळाली की, अवैधरित्या वृक्षतोड करून ट्रॅक्टर राजूर रोडवरून जालन्याकडे येत असून लाकडाची वाहतूक करीत असल्याची खबर मिळाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडवले असता ट्रॅक्टर चालकाने आपल्या मालकाला फोन लावून बोलावून घेतले. घटनास्थळी ट्रॅक्टर मालकाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी अरेरावी आणि हुज्जत घालून ट्रॅक्टर पळवून नेले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरील ट्रॅक्टर चा पाठलाग केला परंतू ट्रॅक्टर हाती लागला नाही.
याप्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून चंदनझीरा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा बाबत तीन जणांविरुद्ध भारतीय संहिता 1860 अंतर्गत कलम 353, 506, 34, अन्वये चनदंझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख बब्बू शेख शेरू, शेख शब्बीर व ट्रॅक्टर चालक (तिघे रा. पीर पिंपळगाव) अशी त्यांची नावे आहेत.
ही कारवाई औरंगाबादचे उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती. पी.पी.पवार यांचे मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर अभिमन्यु खलसे यांचे नेतृत्वात वनपाल सतीश बुरकुले, वनरक्षक बालाजी घुगे व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहीती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पहोर यांनी दिली आहे.
नागरिकांनी जिल्ह्यात कुठेही अवैधरित्या वृक्षतोड होत असल्यास तात्काळ वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यात अवैधरित्या वृक्ष तोड होत असल्याचे दिसून आल्यास संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– पुष्पा पवार,सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी, जालना