पुणे । महाराष्ट्रात शिक्षण विभाग देखील भ्रष्ट्राचाराने प्रचंड बरबटलेले दिसत आहे. जिल्हा पातळीवर शिक्षणाच्या नावाने बोंब असलेल्या शिक्षण विभागाचे भ्रष्टाचाराचे पालेमुळे चक्क विभागीय कार्यालयापर्यंत पोहचले आहेत. वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणार्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ महिला लेखाधिकार्यासह दोघांना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. त्यामुळे शिक्षण विभागाचा गैर कारभार आणि बोगस कामे पंखाखाली झाकून ठेवल्याचे दिसून येत आहे.
वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला प्रभाकरराव गिरी (वय 38), कनिष्ठ लेखाधिकारी अनिल श्रीधर लोंढे (वय 57) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार शिक्षक आहे. त्यांना सेवा पुस्तकावर सहाव्या आणि सातव्या आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करून हवी होती. पडताळणीसाठी प्रमिला गिरी यांनी सहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत पाच हजार रुपये देण्याचे मान्य करून तक्रारदार शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर लष्कर भागातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात सापळा लावून गिरी आणि लोंढे यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गरुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार तपास करत आहेत. शिक्षण विभागाची यामुळे प्रचंड प्रतिमा मलिन झाली आहे.