उत्तर प्रदेशमध्ये सरयू एक्स्प्रेसमधील महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार झाला आहे. तर त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पुरा कलंदर पोलीस स्टेशन परिसरात पोलीस आणि अनीस यांच्यात चकमक झाली. पुरा कलदनारचे पोलीस अधिकारी देखील क्रॉस फायरिंगमध्ये जखमी झाले आहेत. तीन आरोपींनी सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग केला होता, तिने विरोध केला असता त्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार झाला आहे. तर त्याच्या आणखी दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. या दोघांना अयोध्येतील इनायतनगर येथून चकमकीनंतर अटक करण्यात आली.
घटनेच्या दिवशी अनीसने महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी महिला कॉन्स्टेबलने गुन्हेगाराला विरोध करत खाली पाडले. तेव्हा अनीस आणि त्याच्या साथीदारांनी महिला कॉन्स्टेबलवर जीवघेणा हल्ला केला. महिला कॉन्स्टेबलचे डोके रेल्वेच्या खिडकीवर आपटून जखमी केले होते. अयोध्येपूर्वी ट्रेनचा वेग कमी झाल्यावर तिन्ही बदमाशांनी ट्रेनमधून उडी मारून पलायन केले. तेव्हापासून पोलीस तिन्ही आरोपींचा शोध घेत होते.