जालना जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार व त्यांच्या पथकावर घनसावंगी तालुक्यातील भादली येथे दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास दगड आणि लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 8 वाजता घनसांवगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज शुक्रवार दि. 1 मार्च 2024 रोजी रात्री 8 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय.
भादली येथील गोदावरी नदी पात्रामधून वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी रोजीच्या रात्री 11 वाजता अप्पर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने अचानकपणे धाड टाकली. दरम्यान वाळूची अवैध वाहतूक करणारे 3 हायवा व 3 ट्रॅक्टर तसेच वाळूचे अवैध उत्खनन करणारे 1 जेसीबी पकडले होते. मात्र पोलीस ठाण्यात वाहने घेवून येत असतांना वाळू माफियांनी पथकावर दगड, लोखंडी रॉडने हल्ला करुन पथकाच्या ताब्यातील वाहने पळवून नेले. यात काही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
सदर हल्ल्यामध्ये पथकाने आणलेल्या मारुती सुझुकी एरटीगा या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पथकातील कर्मचारी अक्षय आडेकर यास वाळू माफियांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
वाळू माफियांनी पथकावर हल्ला करून ताब्यात घेतलेली वाहने पळवून नेली असून एक हायवा ताब्यात घेऊन घनसावंगी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.
पळून गेलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या गंभीर घटनेची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना देण्यात आली. तसेच घटनेतील गुन्हेगारांवर घनसावंगी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्यामुळे गौण खनिज अवैध उत्खनन व प्रतिबंधक पथकातील कर्मचारी यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून केला जात आहे असे असले तरी कर्मचारी व अधिकारी यांचे मनोधैर्य खच्ची न होता वाळू माफियांच्या विरोधात कठोर मोहीम राबवून जास्तीत जास्त कारवाई करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे महसूल अधिकारी यांनी सांगितले.
या कारवाईदरम्यान अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्यासोबत तहसीलदार योगिता खटावकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी सैफ अहमद,अव्वल कारकुन बालाजी पापुलवाड,मंडळ अधिकारी प्रवीण गजरे, तलाठी संदीप नरुटे, नितीन काचेवाड, रवी वैद्य, अशोक गायकवाड, अशोक चालक कमाने, योगेश कुरेवाड, अक्षय आडेकर, अनिल बर्डे, शिपाई जाधव, तलाठी तांबोळी, अक्षय आडेकर आदी पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे सुमारे 15/20 अधिकारी कर्मचारी 3 खासगी गाड्या करून गेले होते. यापैकी एका गाडीचे काच फोडण्यात आले तर दुसर्या गाडीतील कर्मचार्यांना जबर मारहाण करण्यात आल्याच्या माहिती आहे. मात्र कारवाई करून पोलीस ठाण्यात परतत असताना हा धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान आता तरी अवैध वाळूचे उत्खनन करून त्यांची वाहतूक करणार्या वाळू माफियांचा बंदोबस्त प्रशासन लावणार का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.