कुंभारी:-भारतीय जनता पार्टी महायुतीने सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी (दि. १६) जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. विजयी संकल्प रॅली काढून भाजपने मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरच्या दौऱ्यावर होते. पार्क चौक येथील रॅलीतील सभेत सहभागी होऊन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
माढा लोकसभेसाठी खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर
तर सोलापूर लोकसभेसाठी आ. राम सातपुते हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी सकाळी १० छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. उमेदवारांसाठी खास फुलांनी सजविलेला रथ तयार केला होता. या रथातून केलेली संगीत धून आणि गाणे वाजविले जात होते. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, सोलापूर शहर, पंढरपूर-मंगळवेढासह माढा मतदारसंघातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीत खा. जयसिध्देश्वर महास्वामी, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. शहाजी पाटील. आमदार समाधान आवताडे, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, रश्मी बागल भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे सहभागी झाले होते.
उमेदवारांचे अभिवादन
आ. राम सातपुते, खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे दोन्ही उमेदवार रथातून रॅलीत सहभागी होत मिरवणूक मार्गावर कार्यकर्ते आणि मतदारांना अभिवादन करत होते. छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सरस्वती चौक मार्गे विजयी संकल्प रॅली चार पुतळा येथे आल्यानंतर रॅलीचे जाहीर सभेत रूपातंर झाल्याचे दिसून आले.
मोदींचे मुखवटे चेहऱ्यावर
रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मोदींचे मुखवटे आपल्या चेहऱ्यावर लावले होते. रासप, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपाइं आठवले गटाचेही कार्यकर्ते झेंडे घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. अनेक कार्यकर्ते हातात कमळ चिन्ह घेऊन कडक उन्हातही भाजपचा नारा देत शक्तिप्रदर्शन करत होते.