नवीन भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कायद्याच्या प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी कारवाईला सुरुवात केलीय. जालना शहरात किंवा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी टोळी चालू देणार नाही, कुणालाही त्यात सुटका नाही, अन्यथा तडीपारी, एमपीडीए, मोक्का सारखी कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी दिलाय. शुक्रवार दि. 26 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजता शहरातील आणि जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस अधिक्षक कार्यालयात बोलावून तंबी देण्यात आलीय. यावेळी 100 पेक्षा जास्त गुन्हेगारांना पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या परिसरा बोलावण्यात आलं होतं.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याप्रमाणे गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्याचा अधिकार पोलीस अधिक्षक यांना देण्यात आलाय. त्यामुळे मर्डर, हाप मर्डर, किंवा इतर गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. यावेळी सर्वांना पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी वॉर्निंग दिलीय. यापुढे कोणतेही गुन्हे करु नका, आता तरी सुधरा, तसे न केल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. जो बाँड गुन्हेगार देतील त्यानुसार त्यांना वागावं लागणार असून त्याचं पालन करणे देखील आवश्यक आहे. पेट्रोलिंग, रात्रगस्त आणि चेकिंग करण्यात येणार आहे. असंही पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी म्हटलंय.