पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील सुरक्षित आणि बेरोजगार युवकांसह पशुपालक शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यांच्या शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना आणि उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्रांचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध योजना उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थ्यांची निवड करण्याची पद्धत सुरू केली आहे.
याबरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दर वर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी सन 2021 ते 2022 पासून पुढील पाच वर्षांपर्यंत म्हणजे 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय शासनाने केली आहे त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांची प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळू शकेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थीस हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरता नियोजन करणे शक्य होणार आहे.
त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाह्य देणे, 100 कुकुट किल्ल्यांचे वाटप , 25 +3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2022- 23 या वर्षात राबवली जाणार आहे.
पशुपालकांना डेअरी पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करायचा आहे त्याची निवड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळ – https://ah.mahabms.com, अॅड्रॉइड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव – AH.MAHABMS (Google Play स्टोअर वरील मोबाईल अॅप वर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा कालावधी – दि. 13 डिसेंबर 2022 ते दि. 11 जानेवारी 2023 असा आहे. टोल फ्री क्रमांक – 1962 किंवा 1800-233-0418 आहे.
या योजनेची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत याबाबतचा संपूर्ण तपशील सदर संकेतस्थळावर तसेच मोबाईल एप वर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावे लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरता स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा.
अर्ज भरताना अर्जदाराने नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर स्थितीबाबत संदेश कळविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदार पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, विस्तार पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परीषद तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थी साठी ऑनलाईन अर्ज मागविणे 2022-23 तपशील दिनांक, कामाचा तपशील व एकूण दिवस/कालावधी पुढील प्रमाणे आहे.
दि. 13 डीसेंबर 2022 ते दि. 11 जानेवारी 2023 ऑनलाइन अर्ज स्वीकारणे- एकूण कालावधी- 30 दिवस. दि. 12-13 जानेवारी डाटा बॅकअप करणे- कालावधी 2 दिवस. दि 14 ते 18 जानेवारी 2023 लाभार्थी प्राथमिक निवड – कालावधी 5 दिवस. दि. 19 जानेवारी 2023 राखीव- 1 दिवस. दि. 20 ते 27 जानेवारी मागील वर्षी तसेच यावर्षीच्या लाभार्थी मार्फत कागदपत्रे अपलोड करणे- कालावधी 8 दिवस. दि. 28 जानेवारी 23 राखीव – कालावधी 1 दिवस. 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2023 पशुधन विकास अधिकारी, विस्तार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे- कालावधी 8 दिवस. 6 फेब्रुवारी 23 राखीव 1 दिवस. दि. 7-8 फेब्रुवारी 2023 लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटीची पूर्तता करणे कालावधी – 2 दिवस. दि. 9 फेब्रुवारी 2023 कागदपत्रे अंतिम पडताळणी करणे – कालावधी 1 दिवस. दि. 10 फेब्रुवारी 2023 राखीव 1 दिवस. दि. 11 फेब्रुवारी 2023 अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार – कालावधी 1 दिवस, असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.